अखेर ‘पद्मावत’ ला मुहूर्त मिळाला ; २५ जानेवारीला होणार प्रदर्शित

0
54

मुंबई : वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पद्मावती चित्रपटाचे १ डिसेंबर रोजी होणारं सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलल्यानंतर सिनेमा नेमका कधी प्रदर्शित होणार, याकडे बॉलिवूड तसंच चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. पण शेवटी प्रदर्शनाचा मुहूर्त सापडला. अखेर ‘पद्मावत’ या नव्या नावाने २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन २५ जानेवारी रोजी केले जाणार आहे. तसेच या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून यू/ए प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेता रणवीर सिंह आणि शाहीद कपूर या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. ‘पद्मावती’ ला सातत्याने होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे नाव बदलण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाने दिली होती. तसेच सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या आवश्यक बदलानंतर चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र दिले जाईल असे सांगण्यात आले होते. याशिवाय नावासोबतच चित्रपटातील घूमर गाण्यामध्येही बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सतीच्या प्रथेला पाठिंबा नसल्याबाबतचे सूचनापत्र चित्रपटापूर्वी दाखवण्यात यावे, असेही यामध्ये सांगण्यात आले होते. सेन्सॉर बोर्डाच्या आदेशानंतर भन्साळींनी चित्रपटाचे नाव बदलण्यास तयारी दर्शवली होती. तसेच या चित्रपटाचे नाव बदलून चित्रपट प्रदर्शनाची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर यातील सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र दिले असून, चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख २५ जानेवारी अशी असेल, ही माहिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here