…अखेर मालवणच्या रॉक गार्डननं कात टाकली !

0
481

मालवण : बच्चे कंपनीसह पर्यटकांचे खास आकर्षण ठरत असलेले मालवणचे रॉक गार्डन आता कात टाकत आहे. गेली काही वर्षे बंदावस्थेत असलेल्या छोट्या तळ्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या तळ्यात लहान मुलांसाठी हॅण्डल बोटींगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मालवणचे रॉकगार्डन पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरले आहे. येथे येणारा प्रत्येक पर्यटक हा रॉकगार्डनला भेट दिल्याशिवाय माघारी परतत नाही. त्यामुळे पर्यटकांसोबत येणार्‍या लहान मुलांना रॉकगार्डनमध्ये विरंगुळा मिळावा यासाठी यापूर्वी अनेक ठिकाणी खेळणी बसविण्यात आली होती. मात्र सद्यःस्थितीत या खेळण्यांची दुरवस्था झाली आहे शिवाय टॉयट्रेनही बंदावस्थेत आहे. यामुळे लहान मुले रॉकगार्डनमध्ये आल्यानंतर त्यांना खेळण्यास कोणत्याही सुविधा नसल्याने नाराजी व्यक्त होत होती. या नाराजीची दखल आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांनी घेत थेट छोट्या तळ्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बंदावस्थेत असलेल्या तळ्याची दुरुस्तीचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. या तळ्यात जापनीज् कोळीकार्प ही मासळी सोडण्यात आली. तसेच मुलांसाठी सहा हॅण्डल बोटी ठेवण्यात आल्या आहेत. या बोटींवर लहान मुलांच्या पसंतीस उतरले असून लहान मुले धमाल मस्ती करत आहेत. रॉकगार्डनमध्ये एलईडी दिवे बसविण्याची कार्यवाही सुरू असल्याने रात्रीच्या वेळीही या तळ्यात लहान मुलांना मौजमजा करता येणार आहे. या तळ्यात येत्या काळात टायगर शार्क, एलटिना ही मासळीही सोडली जाणार आहे. रॉकगार्डनमध्ये येणारे पर्यटक दोन ते तीस तास मौजमजा करण्यासाठी राहावे, यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून या छोट्या तळ्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. छोट्या तळ्याबरोबरच सुमारे पाच लाख लिटर पाणी राहण्याची क्षमता असलेले मोठे तळे उभारून त्यामध्ये पॅडल बोटींग व इतर बोटींगची सुविधा मोठ्या पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही येत्या काळात पालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी सुमारे २५ लाख रुपयांचा आराखडा बनविण्यात आला असल्याचे आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here